बेळगाव – हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाने विद्यमान भाजप मंत्र्याच्या जमीन घोटाळा आणि राजीनाम्याच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली आहे. याचवेळी निधर्मी जनता दलाच्या आमदारांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळा अवमान प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदी घालण्याच्या मागणीवरून दोन्ही सदनात गोंधळ घातला आहे.
आज सोमवारी विधानसभेतील कामकाजास सुरुवात होताच, ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आर. एल. जालाप्पा यांना सभागृहाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या व अन्य मान्यवरांनी जालाप्पा यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर काँग्रेस आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर मंत्र्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर चर्चा व्हावी. जमीन घोटाळा प्रकरणातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एका बाजूला काँग्रेस आमदारांची घोषणाबाजी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला निधर्मी जनता दलाच्या आमदाराने संगोळी रायण्णा पुतळा अवमान प्रकरणी म. ए. समितीवर बंदीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस आणि निजदचे आमदार जोरदार घोषणाबाजी करत असताना, गोंधळाच्या वातावरणातच सभापती कागेरी यांनी प्रश्नोत्तराचा काळही पूर्ण केला. त्यानंतर काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाचे आमदार घोषणाबाजी देत असल्यामुळे सभापतींनी सकाळच्या सत्रातील काम आटोपते घेतले.