सुरुते ग्रामस्थांना कार्ड व फ्री बॉडी चेकअप कॅम्प
कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : महाराष्ट्रातील विशेषत: चंदगड, आजरा, गडहिंग्लज, सावंतवाडी व दोडामार्ग या बेळगाव (कर्नाटक) नजीकच्या तालुक्यातील रुग्णांना शासकीय लाभ मिळावा. यासाठी विजया अर्थो अँड ट्रामा केअर सेंटर (VOTC) बेळगाव येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रवी बी. पाटील यांनी केले. ते हॉस्पिटलचे संपर्क अधिकारी विरेश हिरेमठ यांचेसह सुरुते, ता. चंदगड येथे ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट प्रसंगी बोलत होते.
स्वागत सरपंच मारुती गंगाराम पाटील यांनी केले. डॉ. रवी पाटील पुढे बोलताना म्हणाले, सुरूते गावातील प्रत्येक कुटुंबाला विजया ऑर्थोमार्फत कार्ड पुरवण्यात येतील ज्याद्वारे VOTC मध्ये तात्काळ ऍडमिट करून माफक दरात उपचार केले जातील. लवकरच सुरूतेतील सर्व नागरिकांसाठी फ्री बॉडी चेकअप कॅम्प लावून आजारी रुग्णांना उपचार करण्यात येतील. यावेळी त्यांनी आरोग्य विषयक बहुमोल मार्गदर्शन करताना भविष्यात ग्रामस्थांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
सरपंच मारुती पाटील व उपसरपंच नागोजी नाईक यांनी आरोग्य विषयक समस्या मांडल्या. यावेळी नारायण पाटील, सातू भाटे, रामचंद्र चोपडे, खाचो चिखले, यल्लाप्पा पाटील, दुर्गाराम पाटील, धाकलू भाटे, शिवाजी कांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन युवराज कांबळे यांनी केले. आभार ग्रामसेवक विनय संभाजी यांनी मानले.
——-
बेळगावात म. फुले जन आरोग्य योजनेची गरज
चंदगड, आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी या महाराष्ट्रातील तालुक्यातील रुग्णांना सोयीचे ठिकाण बेळगाव असल्याने अपघात किंवा अन्य तातडीच्या वेळी रुग्णाला बेळगावला नेले जाते. तथापि येथे शासकीय सवलती मिळत नसल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. तो कमी करण्यासाठी विजया अर्थो सारख्या रुग्णालयांना महात्मा फुले जन आरोग्य योजना (जुने नाव- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) लागू करावी. अशी गेल्या पाच-सहा वर्षापासूनची मागणी असून महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाने याची पूर्तता करून दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta