कोल्हापूर – मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्याचा दौरा सुरू केला आहे. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वच आंबेडकरवादी संघटनेसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला. संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यात मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आणि तज्ञांना भेटणार असून त्यांची चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहेत.
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी व ती राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र दौऱ्याला संभाजीराजेंनी सुरुवात केली. या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. कोल्हापुरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने मी अत्यंत ऋणी आहे. कोल्हापूर – पंढरपूर – सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद – नांदेड असा त्यांचा आजचा दौरा असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्वांचे मत घेऊन 27 मे रोजी ते आपली सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत.