भाविकांची गर्दी वाढल्यास मंदिराचे दरवाजेही होणार बंद, जिल्हा प्रशासनावतीने खबरदारी
बेळगाव : महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्ण वाढू लागल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्यामुळेच 19 डिसेंबरला होणार्या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची पोर्णिमा यात्रेसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, महोत्सव, धार्मिक विधी आदीं कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. शनिवार दिनांक 19 डिसेंबरला होणारी सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाविकांची गर्दी वाढल्यास प्रसंगी कोरोना संसर्ग वाढू नये याची दखल घेत मंदिरही बंद केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
डिसेंबर महिन्यातील पोर्णिमेला होणार्या सौंदती येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेला महाराष्ट्रातील रेणुका भक्तांची सर्वाधिक उपस्थिती असते. डिसेंबर महिन्यातील पोर्णीमा यात्रेला प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील किमान तीन ते चार लाख भाविक सौंदतीला दाखल होत असतात. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील रेणुका भक्तांची संख्या मोठी असते. कर्नाटक शासनाने ओमिक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. याचवेळी महाराष्ट्रातही ओमिक्रोन रुग्णांची संख्या वाढत आहे याची गंभीर दखल कर्नाटक शासनाने घेतली आहे. कोरोना संसर्गाचा वाढता धोका ओळखून बेळगाव जिल्ह्यातील सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे आदी ठिकाणच्या यात्रा, उत्सव, महोत्सव आणि धार्मिक विधी कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
मंदिरात पुजारी आणि देवस्थान समितीच्या मोजक्या सदस्यांसह धार्मिक विधी करण्यात यावेत अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी केली आहे. त्यामुळे 19 डिसेंबर रोजी सौंदत्ती डोंगरावर होणारा मंगळसूत्र कंकण विसर्जनचा विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पोर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी रेणुकादेवी देवस्थान समिती पदाधिकारी तसेच सौंदत्ती विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा धोका ओळखून, पोर्णिमेला सौंदतीकडे येणार्या भाविकांना नाक्यांवर पोलिसांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल आदि दाखविण्याबाबत पोलिसांनी विशेष काळजी घ्यावी. मंदिर अथवा डोंगरावर कोणत्याही धार्मिक विधीला परवानगी देण्यात आलेली नाही, याकडे पोलीस लक्ष ठेऊन राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी विविध निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे रेणुकादेवीचे मंदिर अथवा परिसरात गर्दी झाल्यास प्रसंगी मंदिराचे दरवाजे आणि देवी दर्शनही बंद करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा वाढता धोका, स्वत:च्या आरोग्याची काळजी आणि शासनाने लादलेल्या कडक निर्बंधांमुळे यावर्षीची मार्गशीर्ष पौर्णिमा रेणुका देवी यात्रा भाविकांनी आपापल्या गावी भक्ती भावात साजरी करणे उचित ठरणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
Check Also
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेची हिंडलगा, येळ्ळूर व खानापूर केंद्रावरील तयारी पूर्ण
Spread the love येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. …