Sunday , September 8 2024
Breaking News

वैयक्तिक वादाला भाजपकडून राजकीय रंग : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : नगरसेवक अभिजीत जवळकर यांना अटक करून सोडल्याच्या नोंदी पोलिसांकडे आहेत. याबाबत योग्य ती चौकशी करून कारवाई करणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणे ही भाजपची जुनी सवय आहे. नगरसेवक हाणामारी प्रकरणाला काँग्रेस- भाजप असा राजकीय रंग दिला जात आहे. वैयक्तिक भांडणाचे भांडवल करून संपूर्ण शहराला वेठीस धरून त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
भाजप काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करीत आहे. नगरसेवक अभिजीत जवळकर आणि रमेश पाटील यांच्यात झालेली मारामारी हा त्यांचा वैयक्तिक विषय होता. त्याचा महानगरपालिका बरखास्तिशी काहीही संबंध नाही. रमेश पाटील आणि नगरसेवक जवळकर यांच्यात टॉवर बसविण्यावरून मारामारी झाली होती. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. त्याला भाजप -काँग्रेस असा रंग देणे चुकीचे आहे. या प्रकरणी आता न्यायालय निर्णय घेईल. पोलीस खात्याकडे दवाखान्याचे डिस्चार्ज पेपर आहेत. मात्र स्थानिक आमदारांनी पुन्हा एक नवीन डिस्चार्ज पेपर तयार केले असून विनाकारण जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र दवाखान्यातून पहिल्यांदा दिलेले डिस्चार्ज पेपरच ग्राह्य धरले जातील असे देखील यावेळी सतीश जारकीहोळी म्हणाले.
खाऊ कट्टा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, खाऊ कट्ट्यातील दुकान गाळे हे गोरगरीब व दिन दलितांना बंधनकारक होते. मात्र स्थानिक आमदारांनी स्वतःच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना वितरित केली आहेत. ही दुकाने वितरित करत असताना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये लिलावा संदर्भात कोणतीही जाहिरात दिलेली नाही. आमदारांशी सलगी असलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर सदर दुकाने दिली गेली असल्यामुळे या प्रकरणाची रीतसर चौकशी होणार असे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात भाजपचे सरकार होते त्यावेळी सोशल मीडियावर पोस्ट टाकली म्हणून कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यावेळी बेळगावचे राजस्थान झाले होते का? त्यावेळी बेळगावचे बिहार झाले नव्हते का? असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. आगामी दिवाळी अधिवेशनात विकासाच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त चर्चा करण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *