Friday , October 18 2024
Breaking News

दुचाकीस्वाराला वाचविताना बस पलटी

Spread the love

 

गळतगा जवळील घटना; अनेक प्रवाशांना दुःखपत

निपाणी (वार्ता) : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना कर्नाटक बस बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना बुधवारी (२७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. रमेश चव्हाण (मुळगाव हुपरी, सध्या रा. गळतगा) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बसमधील जखमींना रुग्णवाहिकेतून निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये तब्बल ७२ प्रवासी होते. निपाणी आगाराची
बस (केए २३ एफ ०८७८) इचलकरंजी येथून निपाणीकडे परत येत होती. गळतगा-भीमापूरवाडी मार्गावर खणीजवळ आल्यावर निपाणीकडून गळतगाकडे भरधाव वेगाने दुचाकीस्वार (केए २३ ईएल ३३६४) येत होता. दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस चालक आर. ए. बंदी (रा. नवलिहाळ) यांचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात कोसळली.
या अपघातात दुचाकीस्वार रमेश चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बस नाल्यात पलटी झाल्यावर बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केली. तात्काळ गळतगा बसस्थानकावरील अलगोंडा पाटील, संजय कागे, मिथून पाटील, राजू उपाध्ये, बाबासाहेब पाटील, भरत नसलापुरे, बसवराज पाटील, राहूल वाकपट्टे, विजय तेलवेकर, संतोष हुनसे, राजू कमतनूरे, रवी शास्त्री, गिरिष पाटील, विनोद तेलवेकर व नागरिकांनी धाव घेऊन बसच्या वरती चढून प्रवाशांना बाहेर काढले.
बसमधील महिला व एका पुरुषाला छातीला मार लागल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून निपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये असलेल्या एकूण ७२ प्रवाशांपैकी अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी कमी करून रस्त्यावरील वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. निपाणी आगाराचे व्यवस्थापक संगाप्पा बजन्नावर व रवी शास्त्री यांनी भेट देऊन प्रवाशांना दुसऱ्या बसमधून प्रवाशांना पाठविले. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *