Thursday , December 5 2024
Breaking News

गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात

Spread the love

 

चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४६वा सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबदावर ७८ धावांनी मात केली. चेन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने हैदराबाद संघाला २१३ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदरबाद संघाची फलंदाज अत्यंत खराब दिसून आली. ज्यामुळे त्यांचा संघ १३४ धावांवरच गारद झाला. हैदराबादच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करत आली नाही. त्यामुळे या विजयाच्या जोरावर चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत पुन्हा मुसंडी मारली आहे.

चेन्नईने हैदराबादविरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत तीन स्थानांची मोठी झेप घेतली आणि पाच विजयांसह १० गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले आहे, तर हैदराबाद संघ सलग दोन पराभवांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांच्या शानदार खेळीनंतर तुषार देशपांडेच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला. गायकवाड आणि मिशेलच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादची फलंदाजी अत्यंत खराब झाली आणि संपूर्ण संघ १८.५ षटकांत १३४ धावांत गारद झाला.

चेन्नईची दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सीएसकेची सुरुवात खराब झाली होती. कारण वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर मात्र ऋतुराज आणि डॅरिल मिशेल यांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १०७ धावांची शतकी भागीदारी करत डाव सावरला. या दरम्याने गायकवाडने या हंगामातील तिसरे अर्धशतक झळकावले, तर डॅरिलही मागे राहिला नाही आणि आपले अर्धशतक पूर्ण करण्यात यशस्वी ठरला.

अवघ्या दोन धावांनी हुकले ऋतुराजचे शतक 
मात्र, जयदेव उनाडकटने डॅरिल मिशेलला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मिचेलने ३२ चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार ठोकला. यानंतर शिवम दुबेने गायकवाड यांना चांगली साथ दिली. गायकवाडने दुसऱ्या टोकाकडून आक्रमक खेळी सुरू ठेवली आणि सलग दुसरे शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला. मात्र, टी. नटराजनने गायकवाडला शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद करून शतक करण्यापासून रोखले. गायकवाडने ५४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार मारले. यानंतर धोनी मैदानात आला आणि चेन्नईच्या प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

सीएसके टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २०० हून अधिक धावा करणारा संघ

शिवम दुबेनेही आक्रमक फलंदाजी करत २० चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्यानंतर नाबाद माघारी परतला. दोन चेंडूंवर एका चौकाराच्या मदतीने पाच धावा केल्यानंतर धोनीही नाबाद राहिला. गायकवाड आणि मिशेलच्या जोरावर सीएसकेला मजबूत धावसंख्या उभारण्यात यश आले. यासह सीएसके संघ टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावा करणारा संघ बनला आहे. सीएसकेने ३५व्यांदा टी-२० क्रिकेटमध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि या प्रकरणात इंग्लिश काउंटी क्लब सॉमरसेटला मागे टाकले, ज्याने ३४ वेळा टी-२० मध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Spread the love  इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *