Sunday , September 8 2024
Breaking News

‘क्वॉलिफायर१’च्या सामन्यात आज कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान, अंतिम फेरीचे लक्ष्य!

Spread the love

 

अहमदाबाद : तडाखेबंद फलंदाजांचा समावेश असलेले कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या ‘क्वॉलिफायर-१’मध्ये आज, मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीतील विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे दमदार कामगिरीचे लक्ष्य असेल.

कोलकाताच्या संघाने यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करताना ‘प्ले-ऑफ’मध्ये सर्वप्रथम स्थान मिळवले. तर हैदराबादने अखेरच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्जला नमवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. साखळी फेरीतील ७० सामन्यांनंतर अव्वल दोन स्थानी असणाऱ्या या संघांना गेल्या दहा दिवसांत पावसामुळे बरीच विश्रांती मिळाली आहे. हैदराबादच्या संघाने रविवारी सामना खेळला, तर कोलकाताचा राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या सामन्यांनंतर दोन्ही संघ थेट अहमदाबाद येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना येथील परिस्थिती आणि खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नाही.

कोलकाताने आपला अखेरचा पूर्ण सामना ११ मे रोजी खेळला होता. कोलकाताचे गेले दोन सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. त्यापूर्वीच्या चार सामन्यांत त्यांनी विजय नोंदवले होते. दुसरीकडे हैदराबादने गेल्या पाचपैकी केवळ एका सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे कोलकाता आणि हैदराबाद या तुल्यबळ संघांतील आजचा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.

सॉल्टची उणीव, नरेनवर मदार
कोलकाताचा यष्टिरक्षक-फलंदाज फिल सॉल्ट आता मायदेशी इंग्लंडला परतला असून तो ‘आयपीएल’मधील ‘प्ले-ऑफ’च्या सामन्यांना मुकणार आहे. यंदाच्या हंगामात सलामीला येताना सॉल्टने (४३५ धावा) अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे त्याची उणीव कोलकाताला निश्चित जाणवेल. त्याच्या अनुपस्थितीत कोलकाताला आक्रमक सुरुवात करून देण्याची जबाबदारी सुनील नरेनवर असेल. नरेनने यंदा कोलकाताकडून सर्वाधिक ४६१ धावा केल्या आहेत. मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यरला (२८७ धावा) प्रभाव पाडता आलेला नाही. मात्र, याचा संघाच्या कामगिरीवर फारसा परिणाम झाला नाही. परंतु श्रेयसचा कामगिरी उंचावण्याचा मानस असेल. सॉल्टच्या जागी अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमनुल्ला गुरबाझला संधी मिळू शकेल. मात्र, गुरबाझने यंदाच्या हंगामात अद्याप एकही सामना खेळलेला नाही आणि ही कोलकातासाठी चिंतेची बाब ठरू शकेल. कोलकातासाठी आंद्रे रसेलचे अष्टपैलू योगदानही महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या गोलंदाजीची भिस्त नरेन, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती यांच्यावर असेल.

हेड, अभिषेकच्या कामगिरीकडे लक्ष
हैदराबादच्या फलंदाजांनी अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमक शैलीत फलंदाजी करताना सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेषत: हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनीही २०० हून अधिकच्या ‘स्ट्राईक रेट’ने धावा करताना विक्रम रचले आहेत. हेडने आतापर्यंत एक शतक आणि चार अर्धशतकांसह ५३३ धावा केल्या आहे. अभिषेक (४६७ धावा) यानेही चमक दाखवताना यंदा ‘आयपीएल’मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ४१ षटकार मारले आहे. हैदराबादकडे तिसऱ्या स्थानावर राहुल त्रिपाठीसारखा अनुभवी फलंदाज आहे. मात्र, त्याने कामगिरी उंचावणे आवश्यक आहे. हेन्रिक क्लासनला पुन्हा सूर गवसला असून त्याने अखेरच्या साखळी सामन्यात पंजाबविरुद्ध ४२ धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजीची मदार कर्णधार पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन यांच्यावर असेल. ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार कमिन्सचे नेतृत्व हैदराबादसाठी निर्णायक ठरू शकेल.

About Belgaum Varta

Check Also

कुस्तीमध्ये अमन सेहरावतने जिंकले कांस्य पदक

Spread the love  पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *