बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक झाल्याची प्रकरणे वाढत आहेत. ती रोखण्यासाठी फसवणूक झालेल्यांनी तातडीने सायबर क्राईम ब्रँचकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले आहे.
बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले, गेल्या २ वर्षांत बेळगाव पोलिसात ऑनलाईन फसवणुकीची ४७ प्रकरणे दाखल झाली आहेत. ओटीपी, ओएलएक्स, फेसबुक, तिकीट बुकिंग, मॅट्रिमोनिअल साईट अशा माध्यमांतून फसवणूक झाल्याची १९ प्रकारची प्रकरणे उघडकीस आली होती. यात ऑनलाईन ट्रान्सफरच्या माध्यमातून ६५ लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आला होता. तपासानंतर त्यापैकी ३० लाख रुपये रिकव्हर करण्यात आले आहेत. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ऑनलाईन फसवणुकीला पायबंद घालण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत. अशी फसवणूक झाल्याच्या एक तासाच्या आत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यास गेलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे तातडीने तक्रार नोंदवणे गरजेचे आहे असे डॉ. आमटे म्हणाले.
बेळगाव महिला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानव तस्करी रोखण्यासाठी मोहीम राबवून ५ मुलांची आणि ८ महिलांची सुटका करण्यात आली आहे. अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यास ती पोलिसांना कळवावी असे आवाहन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले. एकंदर, ऑनलाईन फसवणूक झाल्यास एका तासाच्या आत सायबर क्राईम ब्रांचकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी केले.