बेळगाव : जुने बेळगाव जवळील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला गेला आहे. ही बाब नुकतीच उघडकीस आली असून प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वैद्यकीय कचरा तात्काळ हटवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
विखरून पडलेल्या या कचऱ्यामध्ये कुलंट जेल बॅग, इंजेक्शन, औषधाची पाकिटे, सलाईन्स, औषधाची बॉटल्स आदींचा समावेश आहे.
सदर वैद्यकीय कचरा कोणाकडून टाकण्यात येत आहे याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
हा वैद्यकीय कचरा आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे याठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला तसेच सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या वैद्यकीय कचऱ्यामुळे त्यांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला जात असून अल्पावधीत हा निसर्गरम्य परिसर वैद्यकीय कचऱ्याचे आगर बनण्याचा धोका निर्माण झाला आहे.