बेळगाव : बेळगावमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेचा मृत्यू झाला असून, माहेरच्या मंडळींनी रुग्णालय परिसरातच संताप व्यक्त केला आहे. वेळेवर जेवण न दिल्याने आणि मारहाणीमुळे मुलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या घटनेनंतर बिम्स रुग्णालय परिसरात दोन्ही गटांत तणाव निर्माण झाला होता.
महाराष्ट्र राज्यातील चंदगड येथील नस्तईन देसाई (२५) या तरुणीचा सासरच्या छळामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी रेहान नेसरीकर याच्याशी तिचा विवाह झाला होता, मात्र तेव्हापासूनच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. शुक्रवारी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. मुलीला जेवण-पाणी न देता उपाशी ठेवले आणि आजारी असतानाही वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी टाहो फोडला. लग्नानंतर हुंडा किंवा इतर कारणावरून तिला सतत त्रास दिला जात होता. या मृत्यूच्या बातमीने बिम्स रुग्णालय परिसरात दोन्ही बाजूचे नातेवाईक भिडल्याने रणकंदनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नस्तईन गेल्या महिन्याभरापासून आजारी होती, तरीही तिला मानसिक आणि शारीरिक छळ सोसावा लागला. तिचा मोबाईल हिसकावून तिला कोणाशीही बोलू दिले जात नव्हते. आम्ही तिला उपचारासाठी घेऊन जातो असे वारंवार सांगूनही सासरच्या मंडळींनी तिला आमच्यासोबत पाठवण्यास नकार दिला, असे अझीम यांनी सांगितले. लग्नानंतर ४ वर्षांपासून माझ्या मुलीचा छळ सुरू होता. तिने माहेरी फोन केला म्हणून पती रेहानने तिचा मोबाईल आणि सिमकार्ड तोडून टाकले होते. तिला बेल्टने बेदम मारहाण केली जात होती, अशा शब्दांत हाफीज देसाई यांनी आपले दुःख व्यक्त केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले. सध्या हे प्रकरण एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta