Monday , June 1 2026
Breaking News

मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न आवश्यक : प्रा. नानासाहेब जामदार; मराठी टिकवून, वाढविण्यासाठी कृतीची गरज

Spread the love

 

(मराठी भाषा गौरव दिन विशेष)

निपाणी (विनायक पाटील) : महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक अनेक गावांमध्ये दरवर्षी मराठी भाषा भाषा गौरव दिन साजरा केला जातो. केवळ एकाच दिवशी मराठी भाषेबद्दल जनजागृती व उपक्रम हाती घेतले जातात. त्यानंतर वर्षभर भाषेच्या संवर्धनासह वाढीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. भविष्यात मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी मराठी भाषकांकडून कृतिशील उपक्रम हाती घेणे आवश्यक असल्याचे मत येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभागातील निवृत्त प्राध्यापक आणि पुणे येथे मराठी अभ्यासमंडळाचे माजी सदस्य प्रा. नानासाहेब जामदार यांनी व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
सीमा भागात मराठी भाषा गौरव दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यासारखे कार्यक्रम होतात. मात्र प्रत्यक्षात मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाचा पाया असलेल्या मराठी शाळाच मरणकळा सोसत आहेत, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
बेळगाव जिल्हा मराठी बहुभाषिक समजला जातो. तरीही गेल्या काही वर्षांपासून या विभागातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली असून अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत. सीमाभागातील मराठी नागरिकांचा मराठी बोलण्यासह, कागदपत्रे मराठीतून मिळविण्याचा हक्क आहे; तरीही ग्रामपंचायती, नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, तालुका पंचायत, जिल्हा पंचायतसह विविध सरकारी कार्यालयात मराठी भाषेवर कानडी वरवंटा फिरविला जात आहे. घटनेने दिलेले भाषिक हक्क, लोकनियुक्त मराठी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य असूनही सरकारी पातळीवरील कामे कन्नडमध्येच होत आहेत. हा केवळ भाषेचा प्रश्न नसून मराठी भाषकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारच्या व्यावसायिकांचे मराठी फलक काढून इंग्रजी आणि कन्नड मधून फलक लिहिण्याचा आदेश काढून दंडात्मक कारवाईची भीतीही दाखविली जात आहे.
मराठी शाळा टिकवण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवणे, शाळा प्रवेशोत्सव, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शिक्षक प्रशिक्षक उपक्रम आदी उपाययोजनांची शासनाकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीही मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत नसलेली बाब चिंतनीय आहे. एकंदरीत मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी सीमा भागातील मराठी बांधवांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.
——————————————————————–
पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल
अलीकडच्या काळात पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत सीमाभागातील मराठी शाळेतील पटसंख्या वर्षानुवर्षे कमी होत चालली आहे. कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळा बंद करण्याचा घाटही कर्नाटक शासनाने घातला आहे. त्या विरोधात आतापासूनच लढा उभारण्याची गरज आहे.

About Belgaum Varta

Check Also

शाळा प्रारंभोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम; उद्या होणार शाळांना प्रारंभ

Spread the love  पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी आवश्यक निपाणी (वार्ता) : शैक्षणिक वर्षाला गुरुवारपासून (ता. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *