Sunday , July 26 2026
Breaking News

मराठी भाषा गौरव दिन; लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

Spread the love

 

आपली शान मराठी

आपला मान मराठी

जगण्याचा ध्यास मराठी

महाराष्ट्राचा श्वास मराठी!

आज २७ फेब्रुवारी म्हणजेच आपल्या मराठी माणसांच्या (मराठी) मातृभाषेचा गौरव सोहळा म्हणजेच “मराठी भाषा गौरव दिन”. हा दिवस म्हणजे आपल्या विलक्षण लेखन कौशल्यातून शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेचे साहित्य समृद्ध करणाऱ्या लेखक, साहित्य, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. मराठी साहित्याच्या क्षेत्रात कुसुमाग्रजांचे स्थान एखाद्या दीपस्तंभासारखे आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तसेच मराठी भाषा दिन हा मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी जागतिकीकरणाच्या ओघात “माय मराठी”चे अस्तित्व टिकवून ठेवणे ही मोठी जबाबदारी मराठी माणसाची आहे. संभाषणात इंग्रजी शब्दांचा अधिक वापर वाढत असून परिणामी मराठीचा गोडवा कमी होत आहे. त्यामुळे शब्दांचे शुद्धीकरण महत्त्वाचे आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे इंग्रजी भाषेच्या शाळांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तित्व टिकवणे कठीण बनले आहे. सोशल मीडियाच्या अतिवापराने मराठी साहित्य वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मराठी साहित्याला उर्जितावस्था आणण्यासाठी दर्जेदार साहित्य वाचणे व निर्माण करणे गरजेचे आहे. शिवाय प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या पाल्यांशी मराठीत बोलणे व मराठमोळे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
“माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके” असे म्हणत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृतापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले. संत साहित्यापासून ते आधुनिक काळापर्यंत मराठीने नेहमी प्रबोधन केले आहे. त्यामुळे मराठीमध्ये आपली खूप मोठी जबाबदारी आहे. या मराठी भाषा गौरव दिनी “मराठी वाचूया, मराठी लिहूया, मराठी वाढवूया व मायबोलीचा अभिमान बाळगूया” आपली मायबोली मराठी ही केवळ संवादाचे माध्यम न राहता प्रगती, अभिमानाची भाषा बनविण्यासाठी वचनबद्ध राहूया.

मराठी माणसाच्या जीवनात या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी स्वतःला (मराठी माणूस) म्हणून घेण्याचा संकल्प दिवस आहे. विशेषतः मातृभाषा म्हणजे आपली माय. त्यामुळे आपली भाषा साहित्यातील समृद्धता, मराठी भाषेचे सौंदर्य, भाषिक विविधता टिकवणे आणि ती वृद्धिंगत करणे आणि भाषेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे या “मराठी भाषा दिना”चे मुख्य उद्दिष्ट आहे.
“मराठी भाषा गौरव दिन” मराठी भाषिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिनी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून ती भाषा जपणे, टिकवणे, वाढवणे ही मराठी भाषिक म्हणून आपली जबाबदारी आहे. २०२४ साली केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. कडक निकष पार करत “मराठी”ने मऱ्हाटी बाणा दाखवून दिला. भाषेचा इतिहास, स्वतंत्र अस्तित्व, वारसा हे निकष पार पाडत आज “माय मराठी” डौलाने उभी आहे.

(लेखन – राधिका सांबरेकर)

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *