Friday , March 6 2026
Breaking News

अनंत जांगळे : शांत, सुस्वभावी जिंदादिल व्यक्तीमत्व

Spread the love

 

सर्वसामान्य घरात जन्मलेली पण स्वतःच्या कर्तृत्वाने जनमानसात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी काही माणसे आपल्याला समाजात दिसतात त्यापैकीच एक म्हणजे अनंतराव जांगळे.
बेळगावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि आनंदवाडी येथील रहिवासी रामचंद्र जांगळे हे अनंत जांगळे यांचे पिता. बालपणापासूनच अनंतरावांवर सामाजिक कार्याचे संस्कार झाले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेल्या अनंतरावांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा ध्यास होता. याच ध्यास आणि जिद्दीतून त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास केला. त्यातूनच त्यांना नाटक, सिनेमा, ऑर्केस्ट्रा या मनोरंजन क्षेत्राचा सूर गवसला. त्यांच्या ध्येयाला जिद्दीची साथ आणि अल्पावधीतच मिळालेला यशाचा मार्ग यातूनच त्यांच्यातील दर्दी नाट्यकर्मी जागा झाला.

पुढच्या पन्नास वर्षांहून अधिक काळात त्यांनी मेलडी मेकर्ससह असंख्य लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केवळ बेळगावातच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक, गोवा, कोकण आणि महाराष्ट्रात आयोजित केले. नाटकांचे प्रयोग आयोजित करत असतानाच त्यांनी बेळगाव शहरातील चित्रपटगृहात अनेक लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित केले.कर्नाटक सरकारच्या जाचक करामुळे बेळगाव सीमाभागात मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करणे अत्यंत कठीण आणि आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नव्हते. अशावेळीही अनंतरावांनी जोखीम पत्करून बेळगाव सीमा भागातील नाट्यप्रेमींना निखळ मनोरंजनाचा आनंद नाट्य प्रयोगांच्या माध्यमातून मिळवून देण्याचे काम अखंडितपणे केले.

स्कूल ऑफ कल्चर चे ते संचालक होते.आपल्या माय मराठी भाषेची त्यांनी केलेली सेवा बेळगावकरांच्या सदैव स्मरणात राहील.नाटक, सिनेमा, ऑर्केस्ट्रा म्हटले की अनंत जांगळे असे समीकरण झाले होते. त्यातूनच त्यांना “ज्येष्ठ नाट्यकर्मी” ही उपाधी देण्यात आली होती. अ.भा. नाट्य परिषदेचे ते सदस्य होते. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अ.भा. नाट्य परिषदेने त्यांना २०१८ मध्ये मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या अ.भा. नाट्य संमेलनात “जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. मेलडी मेकर्सच्या पुणे येथे झालेल्या हिरक महोत्सवात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नाटक, सिनेमा क्षेत्रात कार्य करत असतानाच, बेळगावातील विविध संघ व संस्थांच्या कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत. दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय संस्थेत अनंतरावांची बिनविरोध निवड झाली होती. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सहसचिव आदी पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. सार्वजनिक वाचनालयाचे ते विद्यमान संचालक होते. सहकार क्षेत्रात नावाजलेल्या तुकाराम सहकारी बँकेत 1995 सालापासून आतापर्यंत गेली तीस वर्षे त्यानी संचालक पदाची धुरा सांभाळली. त्यांना शेतीची ही आवड होती. देसूर येथील आपल्या शेतात ते स्वतः जातीने लक्ष घालून देखरेख करत असत.
अनंतराव यांना पर्यटनाची मोठी आवड होती. त्यांनी आपल्या हयातीत अनेक देशांचा प्रवास केला. विविध देशांना भेट देऊन तेथील चालीरीतींचा अभ्यास केला. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी गणेश उत्सव तेथे मोठ्या थाटामाटात साजरा केला. टोरंटो येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाट्यप्रयोगादरम्यान प्रशांत दामले यांच्यासह अन्य नाट्यकर्मींनी अनंत जांगळे यांच्या कार्याचे कौतुक केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. गेल्या वीस-बावीस वर्षापासून ते समाज सुधारणा मंडळात असून अनेक वर्षे उपाध्यक्ष म्हणून व काही वर्षे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेचे सदस्य म्हणून पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या अनंतरावानी या संस्थेचे तीन वेळा अध्यक्ष होण्याचा मान मिळवला. जायंट्सच्या राज्य कार्यकारणीत त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली. त्यांनी दोन वेळा जायंट्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष म्हणून कार्य केले.
आनंदवाडी येथील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग होता. या भरीव कार्यामुळेच अनंतरावांच्या पत्नी अश्विनी यांना आनंदवाडी, हिंदवाडी आणि परिसरातील नागरिकांनी बिनविरोध निवडून दिले. हिंदवाडी येथील हिंद हाउसिंग सोसायटी व हिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थांशी ते निगडित होते. हिंद सोशल क्लब आणि स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघटनांमध्ये त्यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.
शहापूर स्मशानभूमीच्या सुधारणेसाठी कार्यरत असलेल्या मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाचे ते सल्लागार होते.
अनंतराव यांना त्यांच्या यशस्वी जीवनात त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी यांची खंबीर साथ लाभली. अभिजीत व सुशांत या आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण आणि चांगले संस्कार दिले. उच्च शिक्षण आणि आईवडीलांच्या चांगल्या संस्काराच्या जोरावर त्यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:ची चांगली ओळख निर्माण केली आहे. आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शांचा वसा पुढे चालविण्याचा संकल्प दोन्ही मुलांनी व्यक्त केला आहे.
अनंतराव म्हणजे नेहमी हसतमुख राहणारे एक शांत सुस्वभावी जिंदादिल व्यक्तीमत्व त्यांच्या निधनाने बेळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आजच्या बाराव्या दिनी त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!
पत्रकार श्रीकांत काकतीकर

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *