चलवेनहट्टी ग्रामस्थांचे काकती पोलिसांना निवेदन
चलवेनहट्टी : गुड्डादेवी मंदिर परिसरात सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी चलवेनहट्टी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे काकती पोलिसांकडे केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांनी हे निवेदन स्वीकारले.
गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरातील काजू बागेत बाहेरील युवकांकडून पार्ट्यांचे आयोजन होत असून, त्यातून दारू पिऊन धांगडधिंगा, महिलांवर अश्लील टिप्पणी, बाटल्या फोडणे, सिगारेटचे थोटके फेकणे आणि आपापसांत हाणामारी असे प्रकार घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिगारेटच्या थोटक्यांमुळे आग लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारामुळे एका शेतकऱ्याची झोपडी व काजूची झाडे जळून नुकसान झाल्याचेही नमूद करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात या भागात पोलीस गस्त नियमित असल्याने असे प्रकार आटोक्यात होते; मात्र सध्या गस्त कमी झाल्याने पुन्हा गैरप्रकार वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारांना विरोध केल्यास संबंधितांकडून अरेरावी केली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांनी गस्त वाढवून गैरप्रकारांना आळा घालण्याचे आश्वासन दिले. तसेच अशा घटना आढळल्यास नागरिकांनी ‘११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मनोहर हुंदरे, महांतेश आलगोंडी, अभिजित आलगोंडी, वैजू पाटील, चंद्रकांत आलगोंडी, रघुनाथ आलगोंडी, राम करीबाळे, परशराम आलगोंडी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta