बेळगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात बेळगावमधील विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.
मूडलगी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा तपास गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक आणि पोलीस निरीक्षक वीरभद्रप्पा एन. कडी यांनी केला होता.
तपासादरम्यान गोळा केलेले भक्कम पुरावे आणि तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणातील कायदेशीर गुंतागुंत लक्षात घेऊन पोलिसांनी सर्व बाजू सक्षमपणे मांडल्या.
विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची सखोल सुनावणी घेतली. एकूण ११ साक्षीदार आणि ७१ महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे आरोपी कश लक्ष्मण कौजलगी याच्यावरील पोक्सो आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेले सर्व आरोप सिद्ध झाले. त्यानुसार न्यायालयाने त्याला २० वर्षांची सक्तमजुरी आणि एकूण १ लाख ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
पीडित मुलीच्या भविष्यासाठी आणि पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत ५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
Belgaum Varta Belgaum Varta