बेळगाव : सरकारी कार्यालयं, रस्ते, बसेस आदींच्या नामफलकांमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करावा या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा प्रशासनासह बेळगाव महापालिकेकडून कालपासून शहरातील रस्त्यांचे नामफलक मराठी भाषेत उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनासह स्मार्ट सिटी, बेळगाव महापालिकेकडून शहरातील रस्त्यांच्या नामफलकांमध्ये त्रिभाषा सूत्राचा अवलंब करताना कन्नड व इंग्रजीबरोबर मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यास सुरुवात करण्यात आली असून यामुळे नागरिकांत विशेष करुन मराठी भाषिकात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या कांही वर्षापासून सीमाभागातील विशेष करून बेळगावातील सरकारी कार्यालय, रस्ते बसेस यांच्यावरील नामफलक फक्त कन्नड अथवा इंग्रजी आणि कन्नड भाषेमध्ये लावण्यात येत होते. या पद्धतीने बहुसंख्य मराठी भाषिक असणार्या बेळगावसह अन्य भागात मराठी भाषेचे एकप्रकारे खच्चीकरण करून कन्नडचा वरवंटा फिरवला जात होता. याच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आवाज उठवून पाठपुरावा सुरू ठेवला होता.
यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण-पाटील आणि जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी या पदाधिकार्यांनी गेल्या 1 फेब्रुवारी 2022 रोजी मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाडी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेऊन सरकारी कार्यालयं, रस्ते आदींच्या नामफलकांवर मराठी भाषेचा अंतर्भाव करावा अशी मागणी केली होती.
यावेळी भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने मराठी भाषेच्या अंमलबजावणी संदर्भात राज्य सरकारला आणि जिल्हाधिकार्यांना केलेली सूचना निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य अधिकृत भाषा कायदा-1963 आणि कर्नाटक राज्य स्थानिक प्रशासन कार्यालयीन भाषा कायदा -1981 मधील तरतुदीनुसार कन्नड आणि इंग्रजी भाषेव्यतिरिक्त भाषिक अल्पसंख्यांकांच्या भाषेला प्राधान्य दिले गेले पाहिजे ही बाब. त्याचप्रमाणे कन्नड सक्तीमुळे भाषिक अल्पसंख्यांक मराठी लोकांना होणारा त्रास मनस्ताप जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. त्या अनुषंगाने त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करणे किती आवश्यक आहे हे समिती नेत्यांनी जिल्हाधिकार्यांना पटवून दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी बेळगाव शहरासह सीमाभागात मराठी लोक हे भाषिक अल्पसंख्यांक आहेत हे मान्य करून या भाषिक अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणार्थ आपण योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते. आता जिल्हाधिकार्यांनी आपल्या या आश्वासनाची पूर्तता केली असून काल गुरुवारपासून बेळगाव शहरातील रस्त्यांवर कन्नड आणि इंग्रजी बरोबरच मराठी भाषेतील नावांचा उल्लेख असणारे नामफलक उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
गूडशेड रोड 5 क्रॉस, गोडसे कॉलनी आदी ठिकाणचे फलक मराठीत बसविण्यात आले असून अन्य ठिकाणीदेखील याची अंमलबजावणी होणार आहे. या पद्धतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषेतील नामफलकांबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे मराठी भाषिकांत समाधान व्यक्त होत असून ते समिती नेत्यांची प्रशंसा करताना दिसत आहेत.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …