
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४०४ जवानांचा शानदार शपथविधी आणि दीक्षांत समारंभ पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांनी सर्वोच्च त्याग करून मातृभूमीचे रक्षण करण्याची शपथ घेतली.
ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. परेडचे नेतृत्व प्रतीक चंद्रकांत दिघे या जवानाने मेजर यू. एस. पिल्लाई यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मिलिटरी बँडच्या तालावर जवानांनी केलेले संचलन लक्षवेधी ठरले.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर ही सैन्यातील जुनी रेजिमेंट आहे. पूर्वीपासून शौर्याची परंपरा या रेजिमेंटला लाभली आहे. लष्करी जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती याला खूप महत्त्व असते. प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा तुम्हाला सेवा बजावताना उपयोग होणार आहे. नवे तंत्रज्ञान आवश्यक करणे देखील महत्त्वाचे आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरची गौरवशाली परंपरा जपण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असे उदगार मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी जवानांना मार्गदर्शन करताना काढले. कार्यक्रमाला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे कुटुंबीय, अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते. प्रशिक्षण कालावधीत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या जवानांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta