
शिवप्रतिमेचे पूजन करून किरण जाधव यांनी दिली स्पर्धेला चालना

बेळगाव : मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून आज रविवारी आयोजित वक्तृत्व स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर भवनात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते किरण जाधव, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव, भजनी मंडळांचे मार्गदर्शक आणि भजन प्रशिक्षक शंकरराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, विनायक जांगळे, जयदीप बिर्जे, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जयदीप बिर्जे यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाचा उद्देश कथन केला. किरण जाधव यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करून वक्तृत्व स्पर्धेला चालना देण्यात आली.
“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज” हा वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. मुलांची प्रतिभा आणि त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान आणि आदर, यामुळे ही स्पर्धा खूपच प्रभावी ठरली.
Belgaum Varta Belgaum Varta