बेळगाव : वारंवार कळवून, संपर्क करूनही उघड्या गटारीची समस्या न सोडवणाऱ्या स्मार्टसिटी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांचा गटारीजवळ फुगे लावून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. ही घटना बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉसजवळ घडली. स्मार्टसिटी आणि मनपा अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलून नागरिकांना त्रासात टाकल्याचा आगळ्या पद्धतीने आज टिळकवाडीत निषेध करण्यात आला. आरपीडी क्रॉसवरील उघड्या गटारीत पाणी तुंबून डास, कीटकांची पैदास वाढली आहे. त्याचा येथील रहिवाशांना त्रास होत आहे. त्याशिवाय या गटारीत पडून जखमी होण्याच्या घटनाही घडत आहेत. आतापर्यंत या गटारीत एका लहान मुलासह ८ जण पडून जखमी झाले आहेत. या समस्येवर तोडगा काढून नागरिकांचा त्रास संपुष्टात आणण्याची विनंती स्मार्टसिटी आणि पालिका अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र त्यांनी एकमेकांकडे बोट करत याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या निषेधार्थ बीएसएन रेजिमेंटच्या सदस्यांनी या ठिकाणी फुगे लावून आगळ्या पद्धतीने निषेध केला. यासाठी वरून कारखानीस आणि अनिरुद्ध पाटणेकर यांनी पुढाकार घेतला. ही समस्या सोडविण्यासाठी बीएसएन रेजिमेंटच्या सदस्यांनी टिळकवाडीतील स्मार्टसिटी कार्यालयात संपर्क केला असता, त्यांना मनपाच्या गोवावेस कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यावर दोघांनी मनपाच्या मुख्य कार्यालयात जाण्यास सांगितले. तेथे सदस्यांनी आरोग्य निरीक्षकांची भेट घेतली असता त्यांनी अभियंत्यांची भेट घेण्यास सांगितले. अभियंत्यांनी त्यांना आरपीडी क्रॉसच्या आरोग्य प्रभारीचा मोबाईल नंबर दिला. आरोग्य प्रभाऱ्याने, आम्ही गटारीत गाळ काढतो. पण कायमस्वरूपी तोडग्यासाठी स्मार्टसिटी ऑफिसलाच जा असे सांगितले. सदस्यांनी याबाबत स्थानिक नगरसेवकांशीही संपर्क केला. परंतु ही समस्या काही सुटली नाही. त्यामुळे बीएसएन रेजिमेंटच्या सदस्यांनी गटारीजवळ फुगे लावून वेगळ्या पद्धतीने निषेध केला. ही समस्या सोडविण्यासाठी या परिसरातील रहिवाशांनी एकत्र येण्याचे आवाहन सदस्यांनी केले आहे.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …