बेळगाव : सार्वजनिक गणेशेत्सव परंपरेनुसार १० दिवसांचा साजरा करू द्यावा ही बेळगावातील गणेशोत्सव महामंडळाची मागणी तातडीने सरकारला कळविण्यात येईल. याबाबत सरकारकडून येणारे अंतिम आदेश सर्वानी पाळावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी केले. गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सव महामंडळांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
गणेशोत्सव उत्सव मंडळांना संबंधित खात्यांच्या आवश्यक परवानग्या घेण्यासाठी त्या खात्यांशी चर्चा करून एक खिडकी व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कोविड मार्गसूचीचे पालन सर्व मंडळांनी करावे, उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाईची तरतूद मार्गसूचीत आहे. त्यामुळे उत्सव मंडळांनी याबाबत सहकार्य करावे. शेजारील महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान पुन्हा वाढले आहे. कोरोना रोखण्यासाठीच सरकारने मार्गसूची आणली आहे. त्यामुळे सर्वानी त्याचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव,मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शहापूर विभागाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी गणेशभक्त आणि मंडळाच्या मागण्या मांडून हिंदू परंपरा आणि हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन ५ दिवसांऐवजी परंपरेनुसार १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करू द्यावा अशी मागणी केली.
यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., डीसीपी डॉ. विक्रम आमटे, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी व अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय बेळगावातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.