बेळगाव : केंद्र सरकार तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने गैरवापर करत असल्याचा आरोप करत बेळगावात शुक्रवारी जिल्हा काँग्रेसतर्फे चलो जिल्हाधिकारी कचेरी आंदोलन करण्यात आले.होय, केंद्र सरकार राजकीय हेतूने तपास यंत्रणांचा गैरफायदा घेत आहे असा आरोप करून बेळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.यावेळी बोलताना काँग्रेसचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, देशात भाजप सरकार पद्धतशीर अराजकता माजवत आहे. काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजप सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. देशात अशांतता पसरविण्याचा त्यांचा हेतू आहे. सामान्य जनता सुखाने जगू नये अशी त्यांची इच्छा आहे. आमचे युवा नेते राहुल गांधी यांना गेल्या ३-४ दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावून अडचणीत आणून त्रास दिला जात आहे, हे निषेधार्ह आहे असे त्यांनी सांगितले. काँग्रेस बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले, काँग्रेस हा एकेकाळी ब्रिटिश सत्ता हादरवून सोडलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेसने खूप मोठे योगदान दिले आहे. या पक्षाला आणि नेत्यांना अडचणीत आणण्याचा डाव भाजपने रचला आहे. राहुल गांधी यांना २०१५ मध्येच त्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. मात्र पुन्हा आता ते प्रकरण उकरून काढून ईडीच्या माध्यमातून चौकशी करून भाजप सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. आमचे नेते राहुलगांधी यांनी राजस्थानातील उदयपूर येथे भाजपविरोधात भारत छोडो आंदोलन केल्याने भाजप नेत्यांना घाम फुटला आहे. त्यामुळे काँग्रेस संपविण्याच्या आणि काँग्रेस नेत्यांवर दबाव आणण्याच्या हेतूने भाजप यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप विनय नावलगट्टी यांनी केला. काँग्रेसच्या बेळगाव आणि चिक्कोडी जिल्हा शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या निदर्शनात भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta