बेळगाव : बेळगावात टोळी युद्ध वाढले आहे. रियल इस्टेटच्या नावाखाली अनेकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत जीवे मारण्याची धमक्या देत पैसे उकळण्याच्या घटनात वाढ झालेली आहे यावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी बुधवारी सकाळी सकाळी गुंडांच्या घरावर छापेमारी करत धारदार शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
बेळगाव शहरात विविध ठिकाणी अनेक गाव गुंडांच्या घरावर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या त्यावेळी तीन गुंडांच्या घरातून तलवार, चाकू, जांबिया सारखी धारदार शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
रुक्मिणी नगर येथील श्रीधर सत्यप्पा तलवार (वय 29), महाद्वार रोड येथील विनय शंकर प्रधान (वय 45) तर खंजर गल्लीतील अल्ताफ सुभेदार (वय 26) यांच्यासह 26 जणांच्या घरावर धाड टाकण्यात आली असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रविंद्र गडादी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकांनी बेळगाव शहरातील विविध गुंडांच्या ठिकाण्यावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 150 हुन अधिक पोलिस कर्मचाऱ्यांनी छापेमारीत सहभाग घेतला होता. पहाटे पाच वाजता ही कारवाई करण्यात आली होती.
बेळगाव शहर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, टोळी युद्ध, रियल इस्टेट हाणामारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. समाजात अशांतता पसरवणाऱ्यांना नजर ठेवली जात असल्याचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी स्पष्ट केलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta