बेळगाव : झोपलेल्या अवस्थेतील व्यक्तीचा सांगाडा आढळल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर गावात उघडकीस आली आहे. त्यामुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील शिवापूर गावातील एका घरात एका व्यक्तीचा झोपलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आला आहे. त्यामुळे शिवपुरात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच प्रकाश तवनप्पा मुरगुंडी याचा तो सांगाडा असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा सुमारे 8 ते 9 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा मृत्यू झाल्याचे कोणाला समजले नसल्याने अंत्यसंस्काराअभावी मृतदेह घरातच पडून त्याचा अस्थिपंजर झाल्याची शक्यता आहे. गावकर्यांच्या मते प्रकाश तवनप्पा मुरगुंडी याचा तो सांगाडा असावा. मनोरुग्ण असलेला प्रकाश त्या जुन्या घरात एकटाच रहात होता. त्या जुन्या घरात आतून कडी लावून तो रहात होता. त्यामुळे त्या घराकडे फारसे कोण लक्ष देत नव्हते, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलीस ठाण्याचे सीपीआय मौनेश्वर माळीपाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
प्रकाशचा कोणी खून केला, की आजाराने किंवा भुकेने व्याकुळ होऊन तो मेला याबाबत उत्तरीय तपासणी आणि पोलीस तपासनंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात प्रकरण नोंद झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta