बेळगाव : बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी ऑल कर्नाटक फेडरेशन ऑफ बेडजंगम संघटनेच्या वतीने बेळगावात आज आंदोलन करण्यात आले. बेडजंगम समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी अखिल कर्नाटक बेडजंगम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. डी. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूमध्ये आंदोलन सुरू आहे. याशिवाय राज्यातील विविध भागात जंगम समाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बेडजंगम समाजाच्या नेत्यांनी सोमवारी बेळगावात निदर्शने करून राज्य सरकारच्या दिरंगाईच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महांतेश रणगट्टीमठ म्हणाले, बेडजंगम समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. डी. हिरेमठ हे बंगळुरू येथे सत्यप्रतिपादन सत्याग्रह करत आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी 30 जूनला आमची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सुमारे 20 आमदारांचे म्हणणे ऐकून जंगम समाजाची फसवणूक केली आहे. आगामी काळात आमच्या मागण्या मान्य न करता बी. डी. हिरेमठ यांच्यावर अन्याय केल्यास सरकार पडेल, असा इशारा त्यांनी दिला. रवी शास्त्री, सोमू हिरेमठ, मुरुगेंद्र शास्त्री यांच्यासह बेडजंगम समाजाच्या लोकांनी या निदर्शनात भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta