ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका : खासदार अण्णासाहेब जोल्ले
बेळगाव : चिकोडी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी 2019-20 या वर्षासाठी स्थानिक क्षेत्र विकास निधीतून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत एकूण 9 सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकां प्रदान केल्या आहेत. सुवर्ण विधानसौध प्रांगणात शुक्रवारी (१५ जून) झालेल्या कार्यक्रमात त्यांनी रुग्णवाहिका सुपूर्द केल्या. ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सेवा वेळेवर मिळाव्यात यासाठी प्रत्येकी 16.50 लाख खर्चाच्या सुसज्ज रुग्णवाहिका देण्यात आल्या.
यावेळी बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर व चांगले उपचार देण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरणार आहेत. कोविड आणि पूर सारख्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी सामुदायिक आरोग्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाहने दिली जात आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाहनांचा चांगल्या प्रकारे वापर करून जनतेला उत्तम आरोग्य सेवा द्यावी.
यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य ईरण्णा काडाडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
९ आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुपूर्द
सामुदायिक आरोग्य केंद्र यक्सांबा, प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा, प्राथमिक आरोग्य केंद्र अंकली (ता- चिक्कोडी); प्राथमिक आरोग्य केंद्र यमकनमरडी, -हुक्केरी; प्राथमिक आरोग्य केंद्र ब्याकूड ता-रायबागा; सामुदायिक आरोग्य केंद्र मुगळखोड ता-रायबाग; प्राथमिक आरोग्य केंद्र ऐगली ता-अथणी; सामुदायिक आरोग्य केंद्र कागवाड व सामुदायिक आरोग्य केंद्र अमनगी-निडासोशी गेट ता-हुक्केरी.
Belgaum Varta Belgaum Varta