बेळगाव : शिक्षण खात्याने राज्यात 15 हजार शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी शिक्षण खात्याने सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किती शिक्षकांनाही गरज आहे याचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांची माहिती जमा करण्यात आली असून अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
मराठी, उर्दू व इतर माध्यमांच्या पूर्व प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी प्रथम भाषा विषयाच्या शिक्षकांबरोबर द्वितीय भाषा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिक्षण खात्याकडून लवकरच जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर होणार आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंग करण्यात आले तर गेल्या काही वर्षापासून एकाच शाळेत कार्यरत असणार्या शिक्षकांची बदली अन्यत्र होऊ शकते.