Sunday , December 22 2024
Breaking News

कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Spread the love

आ. श्रीमंत पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी : चोऱ्या, घरफोड्या वाढूनही दुर्लक्ष केल्याचा ठपका
अथणी : कागवाड मतदार संघातील ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त पोलिसांनी वेळीच करायला हवा. परंतु, त्यांच्याकडून निष्काळजीपणा दाखवला जात आहे. कामचुकार पोलीस अधिकारी व पोलिसांना समज द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे केली.
बंगळूर येथे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन आ. श्रीमंत पाटील यांनी त्यांच्यासमोर कागवाड मतदार संघातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अपयशाचा पाढाच वाचला. गृहमंत्र्यांशी चर्चा करताना आ. पाटील म्हणाले, कागवाड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये दरोडे, घरफोडी, भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणे, विद्युत मोटारींची केबल चोरून नेणे, असे प्रकार वाढलेले आहेत. याचा तपास करण्यात कागवाड तालुक्यातील सर्वच ठाण्यांचे पोलीस अधिकारी अपयशी ठरले आहेत. याबाबतच्या असंख्य तक्रारी मतदारसंघातील नागरिकांनी आपल्याकडे केल्या आहेत. त्यामुळेच ही बाब मी तुमच्या कानावर घालत आहे असे आमदारांनी गृहमंत्र्यांना सांगितले.
मतदारसंघातील कागवाड, उगार, ऐनापूर, कृष्णाकित्तूर, मोळे, केपवाड या गावांमध्ये एकाच दिवशी आठ, दहा घरांमध्ये घरफोड्या झाल्या आहेत. ज्यांच्या घरी चोरीची प्रकरणे घडली त्यांच्या घरातून लाखो रुपयांचे सोन्या – चांदीचे दागिने, रोख रकमेसह अन्य किमती ऐवज चोरीला गेला आहे. या चोऱ्या घडून सहा – सात महिने झाले. जुगूळ येथे घर फोडून ३५ तोळे सोने व रोख रक्कम चोरीला गेली. अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या. परंतु, पोलीस खात्याने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने आजअखेर तपास लागलेला नाही. उगार व ऐनापूर येथे शेतकऱ्यांनी कृष्णा नदीच्या काठावर बसवलेल्या विद्युत मोटारींची केबल चोरीला गेली आहे. 200 हून अधिक विद्युत मोटारींची तब्बल २० लाखाची केबल चोरीला गेली असतानाही याचा तपास पोलीस लक्ष देऊन करताना दिसत नाहीत. आमदारांच्या तक्रारीची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून लवकरच कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी केएमएफचे संचालक आप्पासाहेब अवताडे , दादागौडा पाटील, राजेंद्र पोतदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

वाढत्या चोऱ्यांमुळे आमदार संतप्त
मतदार संघातील अनेकांनी आ. श्रीमंत पाटील यांच्याकडे वाढत्या चोऱ्यांबाबत अनेकदा तक्रारी केल्या. ज्यांच्या घरी चोरी झाली ते देखील आमदारांना येऊन भेटले होते व तपास पुढे सरकत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. वारंवार सांगूनही पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने आ. पाटील संतप्त झाले होते. काही पोलीस अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बंगळूरमध्ये गृहमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

About Belgaum Varta

Check Also

साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *