प्रगतिशील आणि साम्यवादीतर्फे आचार्य अत्रे जयंती सोहळ्या निमित्त व्याख्यानाचे आयोजन
बेळगाव : सीमाभागातल्या सीमा प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा देणारे प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांचे बेळगावशी असलेले संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचे आहे; संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यांचे योगदान अविस्मरणीय असून सर्वांना त्यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. मराठी साहित्यातील लेखन जनतेच्या हृदयापर्यंत सहजरित्या भिडू शकेल असे वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये आचार्य अत्रे यांनी लेखन केलेले आहे. कितीही कठीण विषय असला तरी तो सहजरित्या ओघवत्या शब्दात सर्वसामान्य जनतेला कसा समजेल या दृष्टिकोनातून त्यांनी लेखन केले. समाजातील व्यंग आणि त्यावरील परिवर्तनात्मक लेखन केले आहे. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित लेखन, स्पुट लेखन, विडंबन कथा, पटकथा, लघुकथ, गीत लेखन, चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्माते आणि कलाकार कलावंत, पत्रकार, शिक्षक, आमदार यासह अनेक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामधील अनुभव घेऊन सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चौफेर असे लेखन केले. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला क्रिडा, नाट्य, राजकारण, सहकार, धार्मिक, शैक्षणिक, अनेक मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांचा अभ्यास जितका कराल तितका कमीच आहे; हे आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी समजून घेऊन बहुजनांच्या उन्नतीसाठी वेळोवेळी प्रयत्न करायला हवे. मराठा या वृत्तपत्रामधून त्यांनी लेखन केलेले आहे. बेळगांव सीमाभागातील मराठी भाषिकांचे शोषण चिरडून काढण्यासाठी वेळोवेळी बुलंद आवाज उठवून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांची लेखणी उचलली दिसते; अन्यायाविरुद्ध लढण्याची संघर्ष जीवनगाथा पाहायला मिळते. तीन लाख कामगारांचे प्रश्न सोडवून मार्गी लावले. मराठी साहित्यातील दिग्गज लेखक आंतरराष्ट्रीय पातळीवर लेखन केलेले आहे. चौकर ज्ञानामुळे व विलक्षण अशा प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे विविध विषयावर समाजाच्या कल्याणाकरिता लेखणी झिजवली, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघ बेळगाव आणि साम्यवादी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्व आचार्य अत्रे तथा प्रल्हाद केशव अत्रे यांची जयंती आणि त्यानिमित्त ज्येष्ठ विचारवंत पत्रकार प्राचार्य आनंद मेणसे यांचे आचार्य अत्रे जीवनकार्य : बहुआयामी व्यक्तिमत्व एक चिंतन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी गिरीश कॉम्प्लेक्स रामदेव गल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहामध्ये सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत कायदे तज्ञ आणि बेळगावचे माजी महापौर अॅड. नागेश सातेरी उपस्थित होते.
व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत पत्रकार प्राचार्य आनंद मेणसे, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत आनंद कानविंदे, कृष्णा शहापूरकर, अनिल आजगावकर, सुहास हुद्दार, प्रा. निलेश शिंदे, अॅड. अजय सातेरी, प्रा. संजय बंड उपस्थित होते.
स्वागत महेश राऊत यांनी केले. प्रास्ताविक प्रा. निलेश शिंदे यांनी केले. आनंद कानविंदे, अनिल आजगावकर, कृष्णा शहापूरकर, अॅड. नागेश सातेरी यांनी वेगवेगळ्या आचार्य अत्रेंच्या आठवणींना उजाळा देऊन सामाजिक जीवनाबद्दल केलेल्या कार्याचे उल्लेखनीय असे मौलिक विचार मांडले. यावेळी प्रा. अमित जडे, कीर्तीकुमार दोशी, संदीप मुतगेकर, माजी नगरसेवक अनिल पाटील, मुख्याध्यापक व्ही. के. गावडे तसेच व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी प्राध्यापक रसिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्जुन सांगावकर यांनी केले. आभार सागर मरगानाचे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta