बेळगाव : शंभर टक्के महसूल वसुलीसाठी ऑनलाईन बिल भरणा करणार्या नागरिकांना बिलात 5 टक्के सवलत देण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात काल गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील पथदीप सुरू करण्याबाबत चर्चा झाली. हेस्कॉमचे बिल 3 कोटी रुपयांच्या घरात असून ते भरल्याशिवाय पथदीप सुरू करणार नाही अशी भूमिका हेस्कॉमने घेतली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयीन अधिक्षक एम. आय. ताळुकर यांनी यावेळी दिली.
त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांनी हेस्कॉमचे बिल भरण्यासाठी निधीबाबत पत्रव्यवहार केला असल्याची माहिती दिली. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रेल्वे स्थानक व बस स्थानकाचे विकास काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे भविष्यात महसुलात वाढ होण्याची शक्यता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत पाणीपट्टीच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. यावर बोलताना कॅन्टोन्मेंटमध्ये पाणीपुरवठ्याची जबाबदारी आणि पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीकडे सोपविण्यात बाबत विचार व्हावा, अशी सूचना कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी केली.
पाणीपट्टीच्या थकित बिलासाठी एल अँड टी कंपनीने कॅन्टोन्मेंटकडे विचारणा केली आहे. या अनुषंगाने शिल्लक असलेल्या थकबाकीची रक्कम भरण्याबाबत मासिक बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस कार्यालयीन अधिक्षक एम. वाय. ताळूकर, अभियंते सतीश मण्णूरकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …