बेळगाव : अलीकडच्या अतिवृष्टीमुळे कमकुवत झालेले घर अचानक कोसळून सुमारे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोसळलेले घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. प्रकाश हा रस्त्याकडेला भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. आई, वडील, पत्नी, दोन मुले असे त्याचे कुटुंब आहे. रघुनाथ पेठ अनगोळ येथील होळकर यांचे जुने घर अलीकडच्या मुसळधार पावसामुळे कमकुवत बनले होते. काल शुक्रवारी दुपारी प्रकाश भाजी विक्रीच्या कामासंदर्भात घराबाहेर होता. त्याचप्रमाणे त्याची पत्नी देखील कामानिमित्त घराबाहेर गेली होती. घरामध्ये प्रकाशची आई आपल्या मुली समवेत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी अचानक छताची माती खाली पडायला लागल्यामुळे दोघीही घाबरून घराबाहेर पडल्या. त्यानंतर कांही क्षणातच दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आतील बाजूने संपूर्ण घर खाली कोसळले.
या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी घरगुती साहित्यासह घरात ठेवलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार होळकर याचे घर कोसळल्याने सुमारे 1.50 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी आणि स्थानिक नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेची टिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta