बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान बिजगर्णी यांच्या वतीने घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत गावातून पहाटे दुर्गा दौड फेरी काढुन जनजागृती करण्यात येत आहे. या दुर्गा दौड फेरीतील ध्वजाचे घरोघर पुजन करुन स्वागत केले जात आहे.
गेल्या काही वर्षापासून प. पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून श्री शिवप्रतिष्ठान बेळगाव यांच्या वतीने घटस्थापनेपासुन ते विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे ५.३० वाजता प्रभात फेरी काढण्यात येते. मागील वर्षी कोरोना होता. त्यामुळे दौड जोरात होऊ शकला नाही. यावेळी शासनाने नियमात शिथीलता दिल्यामुळे शिवप्रतिष्ठाणच्या मावळ्यांनी यावेळी जोरदार तयारी केली. सकाळीच साडे पाच वाजता सर्व मावळे बिजगर्णीतील शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती जवळ जमा होतात. सर्वांच्या डोक्यात पांढरी टोपी असते. संपूर्ण गावभर हे मावळे अनवाणी फेरी मारतात. छत्रपती शिवाजी महारांजांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन दुर्गा दौड फेरीस सुरुवात होते.
फेरीच्या अग्रभागी हिंदुराष्ट्र भगवा ध्वज असतो. त्यांनतर त्या पाठोपाठ दोन रांगेत सर्व मावळे शिस्तीचे काटेकोरपणे पालन करत मार्गक्रमण करतात. दुर्गा दौड फेरी दरम्यान जागो हिंदु जागो अशी वेगवेगळी पद्य एक मावळा पुढे म्हणतो त्या पाठोपाठ सर्व मावळे गातात. ग्रामस्थ विशेषकरुन महीला वर्ग मोठ्या आनंदाने या फेरीच्या स्वागतासाठी सज्ज असतात घरासमोर सडा रांगोळी काढली जात आहे.
फेरी घरासमोर आल्यावर महिला भक्तीभावाने भगव्या ध्वजाची पुजा करतात. या फेरीत दिडशे ते दोनशे मावळे सहभागी होतात. नऊ दिवस दररोज गावातील एका मंदिरात या दुर्गा दौड फेरीचा समारोप होतो. तेथे आरती होते त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप होतो व पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या फेरीचे नियोजन केले जाते. या फेरीत चार- पाच वर्षापासुन ते तीस -पस्तीस वयोगटातील मुलांचा सहभाग असतो. विजया दशमीच्या दिवशी या फेरीत महीला व तरुणींचाही सहभाग होतो सर्वांच्या डोक्यावर भगवा फेटा किव्हा गांधी टोपी परिधान असतो. त्यामुळे या फेरीचे आकर्षण आणखीनच वाढते. या फेरीमुळे गावातील वातावरण भक्तीमय झालेले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta