बेळगाव : राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी ६ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य सरकारी एन. पी. एस. कर्मचारी संघाचे अध्यक्ष एन. टी. लोकेश यांनी दिली.
गुरुवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव किल्ला येथून संकल्प यात्रेला सुरुवात होईल. यानंतर मध्यवर्ती बस स्थानक, संगोळी रायन्ना चौक आणि त्यानंतर चन्नम्मा सर्कल मार्गे सदर पदयात्रेची सांगता सरदार्स मैदानावर होणार आहे. या पदयात्रेत सहा हजार जण सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
जुनी पेन्शन योजना जारी करून नवी पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, अशी मागणी मागील वर्षी १९ डिसेंबरपासून करण्यात येत आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी ६ नोव्हेंबर पासून संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी तसेच आंदोलनासाठी कर्मचाऱ्यांना संघटित करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर संकल्प पदयात्रा आयोजित करण्यात येत असल्याचे एन. टी. लोकेश यांनी सांगितले.
कर्मचारी संघाचे राज्य घटक अध्यक्ष शांताराम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती एन. टी. लोकेश यांनी दिली. एन.पी.एस. मुळे कर्मचाऱ्यांचे जीवन असह्य झाले असून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांसमोर उभ्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करून नवी पेन्शन योजना रद्द करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. राज्यातील ३९ विभागातील २.५ लाख कर्मचाऱ्यांपैकी १५ हजार कर्मचाऱ्यांना नव्या पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन देण्यात येत आहे. पंजाब छत्तीसगड, झारखंड आणि राजस्थानमध्ये आधीच एनपीएस रद्द करण्यात आली असून कर्नाटकात देखील एन.पी.एस. रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेत डॉ. नागलकर, सतीश बुरुड, दीपक मारुती, एस एम पाटील, उमेश टोप्पद, शाम माळी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta