बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी जेडीएसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी सांगितले.
बेळगावात रविवारी सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जेडीएसचे राज्याध्यक्ष सी. एम. इब्राहिम म्हणाले, जेडीएस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. रमेश जारकीहोळी किंवा जो कोणी नेता आमच्या पक्षाच्या तत्त्वांशी सहमत असेल, आणि पक्षात येऊ इच्छित असेल तर, त्याबाबत जिल्हास्तरावरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जेडीएस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि मी राज्यभर दौरा करत आहोत. याशिवाय माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा येणार आहेत. हजारोंच्या संख्येने लोक प्रतिसाद देत आहेत, असे ते म्हणाले. आम्ही लोकांशी थेट कनेक्ट होत आहोत. संबंधित विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ओळखून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावातील सुवर्णसौधचा लोकांना चांगला उपयोग झाला पाहिजे. या भागातील लोकांना आपल्या अडचणी घेऊन बेंगळूरला यावे लागू नये, त्यांच्या समस्या इथेच निकाली काढाव्यात. राज्यात जेडीएसचे सरकार सत्तेवर आल्यास ही योजना अमलात आणली जाईल असे ते म्हणाले.
जेडीएस पक्ष सर्व समाजाला विश्वासात घेऊन काम करत आहे. सर्व जातींसाठी आमचा पक्ष नंदनवन आहे. प्रत्येकाला समानतेने जगण्याचा अधिकार आहे. कर्नाटकचे सार्वभौमत्व आम्ही कायम राखू असे सांगत आगामी निवडणुकीत प्रचंड मतांनी राज्यात जेडीएसची सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta