बेळगाव : बेळगाव शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईत बेळगावमधील दोन अट्टल घरफोड्यांना अटक करण्यात आली असून दोन्ही चोरांकडून लाखो रुपयांच्या दागिन्यांसह इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बेळगाव शहरात ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरांना बेळगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये चोरी करून गोव्यात कसिनोमध्ये मजा मारणाऱ्या दोन्ही चोरांकडून सुमारे दीड किलो सोने आणि चार किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बेळगावमध्ये ठिकठिकाणी घरफोडीचे सत्र सुरु होते. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच गुन्हे व वाहतूक विभागाच्या डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली एसीपी नारायण भरमणी, चंद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे सीपीआय निंगनगौडा पाटील, कॅम्प पोलीस स्थानकाचे सीपीआय प्रभाकर धर्मट्टी यांच्यासह विशेष पथकाने हि कारवाई केली आहे.
मूळचा वडगाव आणि सध्या साखळी गोवा येथे राहणारा प्रकाश पाटील, आणि मूळचा खानापूर आणि सध्या सिंधुदुर्ग येथे राहणाऱ्या महेश राम काळगिनकोप्प अशा दोघांना शुक्रवारी गणेशपूर येथून अटक करण्यात आली आहे. बेगाव शहर, जिल्हा आणि धारवाड जिल्ह्यातील विविध ठिकाणची २२ घरे या चोरट्यांनी लक्ष केली आहेत. बेळगाव ग्रामीण स्थानकाच्या हद्दीतील २, एपीएमसी मधील २, मारिहाळमधील २, खडेबाजार मधील १, उद्यमबाग येथील १, माळमारुती येथील १ आणि कॅम्प मधील ४ अशी एकूण बेळगाव शहरातील १३ घरे फोडून चोरी करण्यात आली आहे. चोरी केलेला माल इतरत्र नेऊन विकण्याच्या तयारीत असलेल्या या दोन्ही आरोपींकडून ७५ लाख रुपयाचे १.५ किलो सोन्याचे दागिने, ३ लाख रुपये किमतीचे ४ किलो चांदीचे दागिने, १ लाख ८० हजार रुपये किमतीची १ बजाज कंपनीची मोटारसायकल जप्त करण्यात आली असून दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींना अटक करणाऱ्या या विशेष गुन्हे शोध पथकाला बक्षीस जाहीर केले. अलीकडे सुरु झालेल्या घरफोडीच्या मालिका गांभीर्याने घेत, पोलीस विभागाने केलेल्या कारवाईचे बेळगावमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta