मशाल धगधगती ठेवण्याचे करण्यात आले शिवसैनिकांना आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन गांभीर्याने आचरण्यात आला.
शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे नेते नारायण किटवाडकर यांनी शिवसेनेचे नवे निवडणूक चिन्ह “मशाल” प्रज्वलित केली. मशाल प्रज्वलित होतात उपस्थित शिवसैनिकांनी “अमर रहे अमर रहे, माननीय बाळासाहेब ठाकरे अमर रहे”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी, सीमाभागात शिवसेनेची मशाल धगधगली पाहिजेत असे सांगून माननीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते नारायण किटवाडकर यांनी, सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे सांगून महाराष्ट्रातील समस्त आमदार आणि खासदारांनी पक्षभेद आणि गटागटाचे राजकारण दूर सारून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वज्रमूठ आवळावी असे म्हटले.
शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे भूषण होते. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाला न्याय देण्याचं काम केलं असं सांगून सीमावासियांना न्याय हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे म्हटले.
माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी माणसाची मोट बांधली. मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरील आंदोलन केली. शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकारणाला नव वळण दिलं, असे शिवसेना जिल्हा संघटक आणि शहर प्रमुख रवींद्र जाधव यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच शिवसेनेची मशाल धगधगती ठेवा, असे आवाहन शिवसैनिकांना केले.
याप्रसंगी शिवसेना शहर उपप्रमुख संजय पाटील, शिवसेना युवा सेनेचे कुशल मजुकर, अमोल मजुकर, यासह गजानन भंडारी, राजन कृष्णा हन्नूरकर, अशोक मोरे, दीपक सावंत, विनोद नारायण सुतार, मनोहर विठ्ठल सुतार, परशराम गोंदकर, अमेय पाटील, शंकरबहाद्दूर गोरखा, मिनाक्षी पाटील, नागेश बिर्जे, महादेव लोहार, प्रवीण सुतार, भाऊसाहेब चिकोर्डे, अनिल पाटील, उत्तम साळुंखे यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta