बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसाचे भक्कम आधारस्तंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज बेळगावात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांना दिलेल्या भक्कम आधाराचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला. अन्यायाने डांबलेल्या मराठीबहुल सीमाभागावरही शोककळा पसरली. या गोष्टीला आज दहा वर्षे उलटली तरी सीमाभागात बाळासाहेब ठाकरे यांची कमतरता अजूनही जाणवते आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त बेळगावातील रामलिंगखिंड येथील शिवसेना कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना सीमाभाग प्रमुख प्रकाश शिरोळकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि समिती कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहे’, ‘झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद’, ‘बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना मालोजीराव अष्टेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे हे देशातील हिंदूंचे तसेच सीमाभागातील मराठी माणसाचे आधारवड होते. सीमाभागातील निष्पाप मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारला त्यांनी वारंवार ठणकावले होते. त्यामुळेच आज इतक्या वर्षांनंतरही कर्नाटक सरकारला आणि कानडी नेत्यांना जर कोणाचा धाक वाटत असेल तर तो बाळासाहेब ठाकरे यांचाच असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना नेते माजी नगरसेवक दिलीप बैलुरकर, मनोहर हलगेकर, राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, विकास कलघटगी, ऍड. हेमराज बेंचन्नावर यांच्यासह शिवसैनिक आणि म. ए. समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta