
बेळगाव : बेळगावच्या तमाम महिला वर्गाचे हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या शारदोत्सव महिला सोसायटीच्या वतीने यावर्षी आनंद मेळा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत आणि उद्योजिका ज्योत्स्ना पै यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे हा मेळा भरविण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महिला वर्गासाठी त्यांच्या कलाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे विशेष कौतुक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर महिला वर्गासह नागरिकांनी या मेळाव्याला भेट देण्यास प्रारंभ केला असून, नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. 18, 19 व 20 असे तीन दिवस दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे. विविध चटपटीत व रुचकर शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनपसंद कपड्यांच्या तसेच अनेक आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी भरगच्च असे साठ स्टॉल्स असणार आहेत. आयोजनात गृहिणींचा पुढाकार असल्याने रुचकर व घरगुती जेवण ही आनंद मेळाची खासियत आहे. इतकेच नव्हे तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नृत्य व गायन स्पर्धांचे आणि महिलांसाठी फॅशन शोचे आयोजन केले आहे. कराओके वर गाण्याच्या सादरीकरणाची संधी असेल. लहान मुलांना प्रवेश मोफत असून त्यांना खेळ व मनोरंजनासाठी वेगळी जागा असणार आहे. तरी भरपूर करमणूक, खरेदी व चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सपरिवार आनंद मेळाव्यास येण्याचे आवाहन शारदोत्सव महिला सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती गीत व महाविद्यालयीन मुलींसाठी डान्स व महिलांसाठी फॅशन शो आयोजित करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta