बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगाव रिंग रोडच्या विरोधातील येत्या 28 नोव्हेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या भव्य चाबूक मोर्चाला पाठिंबा द्यावा, अशा विनंतीचे निवेदन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी संघटनेला सादर करण्यात आले आहे. त्यावेळी व्यापाऱ्यांनी मोर्चाला आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.
बेळगावचा नियोजित रिंग रोड प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव येत्या 28 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा विराट चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मोठा प्रमाणात यशस्वी करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघ -संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यापारी पदाधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांची भेट घेऊन चाबूक मोर्चाला पर्यायाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच तशा आशयाचे निवेदन त्यांना सादर केले. याप्रसंगी म. ए. समितीचे नेते शिवाजी सुंठकर, युवा नेते आर. एम. चौगुले, ॲड. एम. जी. पाटील, एस. एल. पाटील, आर. आय. पाटील आदींसह व्यापारी उपस्थित होते.
यावेळी बेळगावातील वाहतूक समस्या निवारण्यासाठीच्या रिंग रोडमुळे संबंधित 32 गावातील शेतकरी कसे देशोधडीला लागणार आहेत. त्याचप्रमाणे रिंग रोड ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिजचा पर्याय कसा योग्य आहे, याबाबतची माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी एपीएमसी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना दिली. यावेळी उपस्थित व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी येत्या 28 नोव्हेंबर रोजीच्या शेतकऱ्यांच्या चाबूक मोर्चाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
Belgaum Varta Belgaum Varta