आरपीडी क्राॅसजवळ टायर जाळून आंदोलन
बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी क्राॅसजवळ असलेल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमावेळी ध्वजावरून विद्यार्थ्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. या घटनेने सायंकाळी परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप कन्नड संघटनांनी केला आहे. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी आदी अधिकाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रमावेळी ही घटना घडली असून बुधवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. त्यावेळी वादग्रस्त ध्वज फिरविल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर आज गुरुवारी सकाळपासून आरपीडी क्राॅसजवळ कन्नड संघटनांनी जोरदार निदर्शने सुरु केली आहेत. आरपीडी क्राॅसजवळ रस्त्याच्या मधोमध मुख्य खानापूर रोडवर चौकात टायर जाळून आंदोलन करण्यात आले. काळी वेळ याठिकाणी वाहतूक थांबली होती. संघटनांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा पोलिस बंदोबस्त काॅलेजच्या परिसरात ठेवला असून हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta