बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत चर्चा
बेळगाव : सीमाभागातील मराठी पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अधिस्वीकृती ओळखपत्रासोबत महात्मा फुले आरोग्य योजना, वृद्धापवेतन तसेच सीमाभागात डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना देखील शासनाच्या सुविधा मिळाव्यात याबाबत शनिवारी झालेल्या बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते.
बैठकीच्या प्रारंभी कृष्णा शहापुरकर यांनी सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या व्यथा मांडल्या. गुणवंत पाटील यांनी सीमाभागातील मराठी पत्रकारांचे कौतुक केले व मराठी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
सीमाभागातील मराठी पत्रकारांना कर्नाटक सरकारकडून कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. अधीस्वीकृती ओळखपत्र, महात्मा फुले आरोग्य योजना, यशवंतराव चव्हाण आरोग्य योजना, वृद्धापवेतन या सुविधा मराठी पत्रकारांना मिळाल्या पाहिजेत, अशी मते पत्रकार डी. के. पाटील, प्रसाद प्रभू, परशराम पालकर, प्रकाश बिळगोजी, मधू पाटील, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन सीमासमन्वयक मंत्र्यांना देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी कार्यवाह शेखर पाटील, सुहास हुद्दार, राहुल पाटील, महादेव पवार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta