
बेळगाव : सर्वच बाबतीत मागासलेल्या बेळगावच्या ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मी गेली साडेचार वर्षे प्रथम प्राधान्याने काम करत आहे. मुलींसह कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये हा माझा हेतू आहे. आगामी काळात उच्च शिक्षणाची व्यवस्था घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे आज, रविवारी श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ व श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यात सहभागी होऊन त्या बोलत होत्या.
आ. लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, एक शैक्षणिक संस्था स्थापनेची 50 वर्षे पूर्ण करून तिचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. 50 वर्षांपूर्वी संस्थेची उभारणी करत प्रगती करून या भागातील हजारो मुलांना शिक्षण देणाऱ्या सज्जनांची आठवण करण्याचा हा प्रसंग. या पवित्र संस्थेचा विस्तार करण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील ज्येष्ठ, श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वाय. एन. मजुकर, माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, युवराज कदम, प्रसाद वाय. मजुकर, माजी आमदार दिगंबर पाटील, आबासाहेब दळवी, रावजी पाटील, अमृत शेलार, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, येळ्ळूर ग्रापं अध्यक्ष सतीश पाटील व शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta