बेळगुंदी साहित्य संमेलनात ठराव
बेळगाव : सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करा, असा ठराव आज पार पडलेल्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनात पारित करण्यात आला.
श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आज रविवारी बेळगुंदी येथे मरगाई मंदिराच्या आवारात १७ वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन विविध सत्रात पार पडले. संमेलनात काही महत्वाचे ठरावही मंजूर करण्यात आले.
सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा अन्यथा सीमाभागातील मराठी जनतेला कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची मराठी भाषेत पूर्तता करण्यास कर्नाटक शासनाला सूचित करून सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळवून द्यावा असा ठराव पारित करण्यात आला. त्याचप्रमाणे, सीमाभागात होणारी मराठी साहित्य संमेलने ही मराठमोळ्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. सहा दशकांचा लोकलढा आपणास ज्ञात आहे, तेंव्हा न्यायालयीन लढ्याला लोकलढ्याचे पाठबळ आहेच, त्याचाच एक मूलभूत भाग म्हणून लोक लढा लोक वर्गणीतून संपन्न होत असलेल्या साहित्य संमेलनाला महाराष्ट्र शासनाने दरवर्षी किमान दोन महिने अगोदर शासकीय अनुदान कमीतकमी पाच लाख रुपये संस्थांच्या बचत खात्यात बिनशर्थ जमा करावेत आणि सीमावासीयांना आर्थिक आणि सामाजिक न्याय द्यावा ही विनंती.
हे ठराव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आले.
चार सत्रात झाले संमेलन
बेळगुंदी येथील हे 17 वे मराठी साहित्य संमेलन एकूण चार सत्रांमध्ये पार पडले. सकाळच्या पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी, संमेलनाचे उद्घाटन झाले संमेलनाचे उद्घाटन माजी जि. पं. सदस्य मोहनराव मोरे यांनी केले तर स्वागताध्यक्ष रामचंद्र गणपती पाटील होते
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘साहित्य आणि वर्तमान काळ’ या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम झाला. प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादामध्ये प्रा. दि. बा. पाटील (सांगली) डॉ. दीपक स्वामी (इस्लामपूर) आणि प्रा. भिमराव धुळूबुळू (मिरज) यांचा सहभाग असणार आहे.
तिसऱ्या सत्रात डॉ. अनिता खेबुडकर (मिरज) यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले या संमेलनात निवडक कवींकडून निवडक कवितांचे वाचन झाले चौथ्या शेवटच्या सत्रात ‘कुटुंब रंगलाय काव्यात’ हा कार्यक्रम झाला विसुभाऊ बापट (मुंबई) हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते.
Belgaum Varta Belgaum Varta