Saturday , October 19 2024
Breaking News

आमदार रोहित पवार यांचा बेळगाव दौरा

Spread the love

बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकार सीमावाद तापवण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय होत असताना, महाराष्ट्राला एकत्र यावेच लागेल. सीमा भागातील मराठी जनतेच्या अस्मितेचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आज बेळगाव बोलताना केले आहे.
सीमावाद तापला असताना आणि त्यातच कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव सीमा भागात येण्यास मज्जाव केला असताना, आमदार रोहित पवार आज मंगळवारी सकाळी बेळगावला आले. आपल्या बेळगाव भेटी दरम्यान पवार यांनी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात जाऊन छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी पवार यांनी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी सीमावादा संदर्भात विद्यमान परिस्थिती बाबत सविस्तर चर्चाही केली.

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, बेळगाव सीमा भागातील मराठी जनता गेली 60 ते 70 वर्षे आपल्या अस्मितेचा लढा अखंडितपणे देत आहे. मराठी माणसाची अस्मिता काय असते ते सीमा भागातील मराठी जनतेने दाखवून दिले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकार सीमा वादाला तापविण्याचा प्रयत्न करत आहे. अशावेळी सीमा लढ्यात नेहमीच मराठी भाषकांची खंबीर साथ दिलेल्या शरद पवार साहेबांनी कर्नाटक सरकारला दिलेला अल्टिमेटम कामी आला आहे. पवार साहेबांच्या अल्टिमेटमचा कर्नाटक सरकारने धसका घेतला आहे. मात्र यामध्येही काही जण राजकारण करत आहेत.

आपल्या महाराष्ट्र सरकारने राज्याची अस्मिता टिकवण्यासाठी योग्य ती भूमिका घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला योग्य भूमिका घेण्याची वेळ होती. कर्नाटक सरकारला योग्य पद्धतीने उत्तर दिले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. कर्नाटक-महाराष्ट्र सरकारने संवाद करायला हवा होता. केंद्र सरकारने मध्यस्थी करायला हवी होती. संवाद न करता जे घडतंय ते निषेधार्ह आहे. महाराष्ट्र सरकार ठाम भूमिका घेत नाही.

एका बाजूला सीमा भागातील जनता आपल्या अस्मितेचा लढा देत आहे. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातही सीमा वादाची निर्णायक वेळ आली आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारला आपली ताकद दाखवावीच लागेल. सीमा भागातील मराठी भाषिकांवर अत्याचार होत असताना, महाराष्ट्राला एकत्र यावेच लागेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, आर. एम. चौगुले, मदन बामणे, धनंजय पाटील, महेश जुवेकर, किरण हुद्दार आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *