बेळगाव : शहरात 24 आणि 25 डिसेंबर रोजी, शाहीन कॉलेज आणि अल-अमीन मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात दिव्यांगांसाठी मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तौसीफ मडिकेरी यांनी दिली. शहरात शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, हे शिबिर केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट फॉर फिजिकली हॅंडिकॅप्ड, सिकंदराबाद दक्षिण प्रादेशिक केंद्र, शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि अल-अमीना मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नवी दिल्ली आणि हैदराबाद येथील कुशल डॉक्टरांची टीम सहभागी होणार आहे. ते म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विजापूर तालुक्यातील विशेष दिव्यांगांसाठी तर 25 डिसेंबर रोजी विजापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विशेष दिव्यांगांसाठी हे शिबीर आयोजित केले जाणार आहे.