
बेळगाव : राज्यभरातील मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी २ ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आज अधिवेशनादरम्यान बेळगावमधील कोंडसकोप्प येथे भव्य आंदोलन छेडण्यात आले. अनेक वर्षांपासून ह्या आरक्षणाची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी बंगळूरच्या गवीपूर मठाचे मंजुनाथ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाला हजारोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता. अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला.
काँग्रेसच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. सतीश जारकीहोळी, आर. व्ही. देशपांडे, सिद्धू सवदी, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, श्रीमंत पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी मंजुनाथ स्वामीजी म्हणाले की, बेळगावच्या विधानसौधसमोर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, त्याचप्रमाणे मराठा समाजाला २ ए मध्ये आरक्षण द्यावे यासंबंधी आम्ही या आधी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. सरकारने त्वरित याबद्दल निर्णय घ्यावा.
मराठा समाजाचे नेते तसेच भाजपचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी यावेळी सांगितले की, मराठा समाज हा राज्यात आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला असून त्यासाठी आम्ही पाच वर्षांपासून या समाजाचा 3 बी मधून २ ए मध्ये समावेश करण्यासाठी लढा देत आहोत. सरकारने आमची मागणी पूर्ण करून मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यायला हवे असे ते म्हणाले.
आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. मराठा समाजाबद्दल आपल्याला खूप आदर आहे. ग्रामीण क्षेत्रात आपण या समाजासाठी खूप करीत आहात. तुमची ही मागणी आम्ही सरकारपर्यंत पोचवू असे त्या म्हणाल्या. या नंतर आ. सतीश जारकीहोळी भाषणासाठी उभे राहिले असता त्यांना उपस्थितांपैकी काहींनी मज्जाव केला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. आंदोलकांनी जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष यावेळी सुरु केला.
यावेळी जारकीहोळी म्हणाले की, कुठेही गेलात तरी विरोध हा राहणारच. काहीजण हे राजकारण करतात, राजकीय जीवनात हे नवीन नाही. आम्ही सदैव मराठा समाजासोबत राहू असे ते म्हणाले.
शामसुंदर गायकवाड, माजी आ. मनोहर कडोलकर, नागेश मन्नोळकर, धनंजय जाधव, विनय कदम, प्रवीण पाटील आदींसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta