सर्व व्यवहार सुरळीत : पोलिसांवरील ताण कमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर दूधगंगा नदी व टोलनाका परिसरात दुसऱ्या दिवशी मंगळवार तारीख 20 रोजी किरकोळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवार तारीख 19 रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेते मंडळी व कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले होते.
कर्नाटक शासनाने महाराष्ट्रातील नेतेमंडळींना कर्नाटक प्रवेश बंदी केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते मंडळी व कार्यकर्ते बेळगावला जाऊ नये या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सोमवारी सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने येथील दूधगंगा नदीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेवर कर्नाटक प्रवेशासाठी मोर्चा घेऊन आले. यावेळी कर्नाटक पोलिसांनी त्यांना कर्नाटक प्रवेश बंदी केली. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांच्यात शाब्दिक चकमक व ढकलाढकली झाली. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडून बसून निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे सुमारे दोन तास सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले. बेळगाव येथे महामेळाव्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना व नेतेमंडळींना कर्नाटक पोलिसांनी अटक केल्याने कर्नाटक सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यासाठी कर्नाटक पोलिसांनी सीमा भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
एकूणच सीमा प्रश्नाबाबत दोन दिवसात झालेल्या घडामोडीमुळे सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवार तारीख 20 रोजी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. कर्नाटक पोलिसांच्या वतीने व महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने सीमारेषेवर गस्त घालण्यात येत आहे.
येथील टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. सीमा भागातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. वातावरण निवळल्याने पोलीस ही विश्रांती घेत आहेत.