बेळगाव : 21 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान बेळगावकरांना आंतराष्ट्रीय पतंग महोत्सवाची अनुभूती घेता येणार आहे. रंगीबेरंगी व आकर्षक पतंगांनी आकाश सजणार आहे. दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या वतीने बेळगाव शहरातील मालिनी सिटी मैदानावर 11 व्या भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार अभय पाटील बोलत होते.
21 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 11व्या अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात स्वित्झर्लंड, इंग्लंड, इस्टोनिया यासारख्या सुमारे दहा देशातून पतंगबाज सहभागी होणार असून विविध राज्यातील 25 हून अधिक पतंगबाज सहभागी होणार आहेत. 200 हूब अधिक बहुरंगी विविध आकारांचे आकर्षक पतंग या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत, असे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.
चार दिवसांच्या काळात युवा महोत्सव, बाल महोत्सव, बलून फेस्टिव्हल आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दरवर्षी पतंग महोत्सवाला 2.5 ते 3 लाख लोक भेट देतात. यंदा सुमारे 4 लाख लोक 4 दिवसांच्या या पतंग महोत्सवात सहभागी होण्याची शक्यता असल्याचे आ. अभय पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पतंग महोत्सव आयोजन समितीचे चैतन्य कुलकर्णी म्हणाले, जगातील अनेक देशांत कोविडच्या नव्या लाटेचे थैमान सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पतंगबाजांना बोलावणे खूप कठीण झाले होते. पण अनेक पतंगबाजांनी सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. गेली 10 वर्षे अत्यंत यशस्वी ठरलेला बेळगाव पतंग महोत्सव आता केवळ राज्यस्तरावरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महोत्सव ठरला आहे. यंदाचा 11 वा पतंग महोत्सवही यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संदेश कट्टी, गणेश मळलीकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta