Sunday , December 22 2024
Breaking News

ऑपरेशन मदत अंतर्गत जिव्हाळा फौंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love

चंदगड : डोंगर माथ्यावर वसलेलं वीस घरांच्या वस्तीचा आणि जवळपास शंभर एक लोकसंख्येचा, चंदगड पासून पश्चिमेला 7/8 किलोमीटर अंतरावर वसलेला जंगलातील दुर्गम काजीर्णे धनगरवाडा. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही की पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही, अशाही परिस्थितीत गावातील मूलं उन्हाळ्यात डोक्यावर उन्हाची कायली सोसत व पावसाळ्यात पायात चिखलवाट तुडवत, प्रसंगी वन्य प्राण्यांना चुकवत, जंगलातील आडवाटेने आजही 1ली ते 10 पर्यंतची 13 मूलं व 12 मुली शाळा शिकून मोठे होण्याचे डोळ्यात स्वप्न पाहत रोज 7/8 किलोमीटर शाळेपर्यंत पायपीट करीत आहेत.
गावातील लोक आपल्या पारंपरिक गवळी व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचे पालनपोषण करीत असूनसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली पालकांची धडपड व या कोवळ्या मुलांची जिद्द पाहून, दाटे गावातील रयत फौंडेशनच्या पावसकर साहेबांच्या अथक प्रयत्नाने काजीर्णे-धनगरवाडा व कलीवडे-धनगरवाड्यासाठी 2 शासकीय मीनी अंगणवाड्या नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नुकत्याच सुरू करण्यात आल्या. या अंगणवाडीच्या माध्यमातून आता येथील मुलांना लहानपणापासून शाळेची ओळख होण्यास मदत होणार आहे. आत्ता हीच अंगणवाडी गावातील मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र बनले असून, गावातील मुलंमुली दररोज संध्याकाळनंतर अभ्यासासाठी नियमित उपस्थित असतात.
1ली पासून 4 थ्या ईयत्तेची मुलंमुली रोज 5 किलोमीटर जंगलातील उतरंडीच्या पायवाटेने बिजूर गावातील प्राथमिक शाळेत जातात व परत संध्याकाळी चढण पार करून घरी येतात. तर 5 वी ते 10 वी पर्यंतची मुलंमुली 7/8 किलोमीटर चालत जंगलातील मार्गाने शासकीय न्यु सेमी इंग्लिश स्कूल चंदगडला जातात.
येथील शिक्षकांच्या मताप्रमाणे या वाड्यावरील येणारी मुले अभ्यासू असून वर्गात हुशार म्हणून गणली जातात. अशा दुर्गम भागातील मुलांना प्रोत्साहन देण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे.

काजीर्णे-धनगरवाड्यावरील मुलांची व्यथा या शाळेचे शिक्षक संजय साबळे यांनी ‘ऑपरेशन मदत’ चे कार्यकर्ते राहुल पाटील, कॅन्टोनमेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे व व्हिक्टर फ्रांसीस यांच्या कानावर घातली, तेव्हां त्यांनी या धनगरवाड्याला भेट देऊन मुलांना आपल्या परीने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने बेळगांव जिल्हा पंचायत कार्यकारी अभियंता महांतेश हिरेमठ यांच्याकडून मुलांमुलींना प्रत्येकी अर्धा डझन वह्या, पेन, पेन्सिल्स, कंपास बॉक्स व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. तर ‘ऑपरेशन मदत’तर्फे या मुलांसाठी ग्रीन बोर्ड, खडूचा बाॅक्स, डस्टर तसेच सुलक्षणा सुतार व जितेंद्र लोहार यांचेकडून वह्या आणि खेळण्यासाठी फुटबॉल, व्हाॅलीबॉल, हॅंडबाॅल असे साहित्य उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर या शाळकरी मुलांमुलींची न्यु इंग्लिश स्कूल चंदगड, शाळेपर्यंत रोजची पायपीट थांबविण्यासाठी लवकरच ‘ऑपरेशन मदत’तर्फे मुलांमुलींना सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सायकलींची सोय करण्याचे काम चालू आहे.
हा शैक्षणिक व खेळाचे साहित्य वितरण कार्यक्रम काजीर्णे-धनगरवाड्यावर पार पडला. यावेळी जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, जिव्हाळा फौंडेशनच्या सदस्या डॉ. राजश्री अनगोळ यांनी शिक्षण घेणाऱ्या मुलांची धडपड पाहून पालक, विद्यार्थी व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करून पुढे आवश्यक ती मदत देण्याचे सूतोवाच केले.
यावेळी संजय साबळे, प्रशांत बिर्जे, सुखदा बिर्जे, डाॅ. अनिल पोटे, मनाली पोटे, गितांजली रेडेकर, ग्रंथपाल शरद हदगल, राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ यमकर, बाबू पाटील, सिध्दू यमकर, लक्ष्मण कोकरे, जानू यमकर, प्रतिक्षा यमकर, शालेय विद्यार्थी व काजीर्णे धनगरवाड्यावरील महिला वर्ग, गावकरी उपस्थित होते. या शैक्षणिक मदतीबद्दल काजीर्णे ग्रामस्थांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

या विद्यार्थ्यांसाठी सायकलींची आवश्यकता असून इच्छुक दानशूर व्यक्तींनी राहुल पाटील 9379116027, प्रशांत बिर्जे 9972944878 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे

Spread the love  बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *