बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वत्र इच्छुकांची मोर्चेबांधणी पाहायला मिळत आहे. ग्रामीण मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची स्वतःला उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस लागली आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार महिला मतदारांना वेगवेगळी प्रलोभने देऊन स्वतःकडे आकर्षित करताना दिसत आहेत. कुकर मिक्सर किंवा इतर संसारउपयोगी साहित्य देऊन महिला मतदारांना आकर्षित करत आहेत. कधी रांगोळी स्पर्धा तर कुठे वाढदिवसाचे औचित्य साधून महिला मतदारांना भेटवस्तू देण्याचे प्रकार वाढत आहेत.
एकंदर परिस्थिती पाहता मोदी सरकारने “अच्छे दिन” आणले नसले तरी आक्काच्या मात्र ग्रामीण मतदारसंघात महिला मतदारांना “अच्छे दिन” आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दिली जात आहेत. सध्या ग्रामीण भागात रांगोळी स्पर्धा, हळदीकुंकू सारख्या कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी महिला मतदारांना खाजगी वाहने पाठवून कार्यक्रमस्थळी आणण्यात येत आहे. हळदीकुंकूचे वाण पूर्वी सुगड वाटून किंवा एखादे सौभाग्यलंकार दिले जात असे मात्र यावर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागड्या साड्या, भांडी, रोख रक्कम आदी स्वरूपात वाण देण्यात येत आहे.
एकंदरीत हळदीकुंकूचे तात्पुरते बदललेले स्वरूप पाहता इच्छुकांकडून महिला मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील महिला देखील मिळालेल्या भेटवस्तू स्वीकारण्यात धन्यता मानत आहेत.
राष्ट्रीय पक्षाच्या विद्यमान आमदार कालपर्यंत आपण केलेल्या (40% कमिशन) विकासकामाचा पाढा वाचत होत्या. मात्र आता निवडणुका तोंडावर येताच मतदारांना आमिषे दाखवीत आहेत. आक्काना आपण केलेल्या विकास कामावर विश्वास नाही का? त्यांनी केलेल्या तथाकथित विकासापेक्षा त्या मतदारांना दाखवीत असलेली प्रलोभने मोठी आहेत का? असा सवाल सामान्य जागरूक मतदाराला पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta